आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यांतील व केंद्र शासित प्रदेशांतील ५८ मतदारसंघांसह ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांवरही मतदान होत आहे. अशातच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याबाबतीत एक आश्चर्यकारक किस्सा घडला आहे.
एस जयशंकर हे सकाळीच मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. दिल्लीतील तुघलक लेन येथील मतदान केंद्रावर पोहोचले. तिथे ते रांगेत जवळपास २० मिनिटे उभे राहिले. जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा त्यांचे तेथील मतदार यादीत नावच नव्हते. अटल आदर्श स्कूलमध्ये ते मतदानासाठी गेले होते. मतदार यादीत नाव नसल्याने ते तिथूनच माघारी फिरले. सामान्यांच्या बाबतीत असे अनेक प्रकार झाले आहेत. परंतु एका केंद्रीय मंत्र्याबाबत असा प्रकार घडल्याने यंत्रणेत खळबळ उडाली होती.
जयशंकर मतदान न करताच घरी परतले. घरी येऊन निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदान ओळखपत्रावरील इपिक क्रमांक टाकून पुन्हा चेक केले. तेव्हा त्यांचे नाव अटल आदर्श स्कूलमधील मतदान केंद्रावर नाही तर दुसऱ्या मतदान केंद्रावर आले आहे. यानंतर जयशंकर यांनी पुन्हा त्या मतदान केंद्रावर जात मतदान केले आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.
माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी पुढे यावे. प्रत्येक मत मोजले जाते आणि आपले मत देखील तितकेच महत्वाचे आहे! निवडणूक प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग असेल तेव्हाच लोकशाही बहरते आणि जिवंत दिसते. माता, भगिनी आणि मुलींना तसेच तरुण मतदारांना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.