... तर केरळ सरकार बरखास्त केलं जाईल, अमित शहांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 05:34 PM2018-10-27T17:34:08+5:302018-10-27T17:34:46+5:30
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, यासाठी तेथील भक्तगण एकत्र येत आहेत.
नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केरळसरकार बरखास्त करण्याचा इशारा दिला आहे. जर, अयप्पा स्वामींच्या भक्तांना अटक करण्याचं सत्र राज्य सरकारने असेच सुरू ठेवल्यास, केरळमधील सरकार केंद्र सरकारकडून बरखास्त केलं जाईल, असं अमित शहा यांनी म्हटले. केरळमध्ये शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास येथील भक्तांनी विरोध केला आहे. त्यावरुन, हा वाद उफाळला आहे.
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, यासाठी तेथील भक्तगण एकत्र येत आहेत. या वादात पोलिसांनी आत्तापर्यंत 2061 जणांना अटक केली आहे. महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, तेथील भक्तगण सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य करत नसल्याचे दिसून येते. त्यातूनच, अद्यापही तेथील महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत आहे. याप्रकरणी जवळपास 452 खटले दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी या मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही बंदी हटवली आहे. त्यानंतर, 17 ऑक्टोबर 2018 रोजी सर्वप्रथम महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक भक्तांनी भूमिका घेतली आहे.
कन्नूर येथे भाजपाच्या नवनियुक्त जिल्हा समिती सभेला संबोधित करताना, शाह यांनी केरळ सरकारला इशाराच दिला आहे. जर, राज्य सरकारने स्थानिक भक्तांन अटक करण्याचं सत्र असंच सुरू ठेवल्यास केंद्र सरकारकडून राज्य सरकार बरखास्त करण्यात येईल, असा इशाराच शहा यांनी दिला. शबरीमला प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचा सध्या आगीशी खेळ सुरू आहे. केरळ सरकारने आत्तापर्यंत भाजपा, आरएसएस आणि इतर पक्षांच्या मिळून 2 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मात्र, या सर्वात नुकसान कोणाचं होत आहे ? तुम्ही जर अयप्पा भक्तगणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत असाल, तर उद्या देश त्यांच्या बाजुने उभा राहिल, असेही शहा यांनी म्हटले.