नवी दिल्ली : केरळमधील सबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 48 पुनर्विचार याचिकांवर 22 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र आधीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली नाही.
आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय 28 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने दिला होता. या निकालाच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पाळला होता. तसेच, काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका मान्य करत यावर सुनावणी घेण्याची तयारी सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायमूर्ती आर एफ, नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने दर्शविली आहे. त्यामुळे आता या याचिकांवर 22 जानेवारी 2019 रोजी खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.