तिरुवनंतपूरम : शबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये तणाव सुरू आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांकडून निदर्शने केली जात आहे. दरम्यान, मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन महिला पत्रकार हेल्मेट घालून पोलिसांच्या गराड्यात पोहोचल्या आहेत. मात्र, पोलिसांसह महिलांना निदर्शने करणाऱ्यांनी विरोध करत माघारी जाण्यास सांगण्यात येत आहे.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांचा रस्ता न अडविण्याचे आवाहन पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांना केले आहे. आम्ही याठिकाणी कोणताही मुद्दा उपस्थित करणार नाही. तसेच, येथील भाविकांशी वाद घालणार नाही आहोत. फक्त कायद्याचे पालन करीत आहोत. तसेच, यासंबधी वरिष्ठांशी चर्चा करेन आणि थोड्याच वेळात परिस्थितीबाबत सांगेन, असे पोलीस अधिकारी एस. श्रीजीत यांनी सांगितले.
दरम्यान, सबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी 10 ते 50 वयोगटातील महिलांनी मंदिराच्या सन्निधानममध्ये येऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास पूजा बंद करण्याचा पुजाऱ्यांचा विचार असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले आहे.
हिंदू संघटनांचा केरळात बंदशबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ गुरुवारी विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पाळला. त्यामुळे राज्यात बस, रिक्षा सेवा ठप्प झाली होती तर काही ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाल्याचेही प्रकार घडले.