शबरीमला मंदिरात गेली म्हणून 'सासूकडून मारहाण', पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 04:15 PM2019-01-15T16:15:06+5:302019-01-15T16:15:55+5:30
शबरीमला मंदिरात दोन महिलांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले.
कोची - केरळमधीलशबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथे महिलांना प्रवेश देण्यात आला. 2 जानेवारी रोजी पहाटे 3.45 वाजता 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 2 महिलांनी मंदिरात प्रवेश करुन इतिहास रचला होता. बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची आहेत. मात्र, त्यापैकी कनकदुर्गा यांना त्यांच्या सासुकडून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे.
शबरीमला मंदिरात दोन महिलांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. महिलांच्या या प्रवेशाला क्रांतिकारी पाऊल ठरविण्यात आले. पण, स्थानिक नागरिक आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी याचा कडाडून विरोध केला. तर यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडून आज राज्यात काळा दिवस साजरा करुन केरळ बंदची हाक देण्यात आली होती. तसेच राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. मात्र, एकीकडे मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलांचे कौतुक होत असताना, दुसरीकडे या दोनपैकी एक असलेल्या कनकदुर्गा यांना त्यांच्या सासुने मारहाण केली आहे. याप्रकरणी स्वत: कनकदुर्गा यांनी पेरिंथलमाना पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच कनकदुर्गा यांच्या कुटुंबीयांचा या मंदिर प्रवेशाला विरोध होता. तर, मंदिर प्रवेशाच्या निर्णयापासून कनकदुर्गा त्यांच्या कुटुंबीयांपासून दूरच होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी कननदुर्गा बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसात दाखल केली होती.
कनदुर्गा या केरळमधील परंपरावादी धार्मिक कुटुबांतील महिला आहेत. केरळ राज्याच्या सिव्हील सप्लाइज सरप्राईज कार्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. कनक यांनी मंदिर प्रवेश केल्याचे समजताच दक्षिणपंथी लोकांनी कनकदुर्गा यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.