तिरुवनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील शतकानुशतके चालत आलेली प्रथा अखेर बुधवारी मोडीत निघाली आहे. शबरीमला मंदिरात बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेऊन इतिहास घडवला आहे. पण यानंतर राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. या महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने-आंदोलने करण्यात आली. यादरम्यान, जखमी झालेले 55 वर्षीय चंदन उन्नीथन यांचा मृत्यू झाला.
हिंसक निदर्शनं सुरूचशबरीमला मंदिरातील महिला प्रवेश घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (2 जानेवारी) केरळ बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर, आजही राज्यात हिंसक आंदोलनं सुरूच आहेत. याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोझिकोडेमध्ये आंदोलनकर्त्यांनी दुकानदारांवर हल्ला करत जबरदस्तीनं दुकानं बंद करण्यास भाग पाडले.
'आरएसएस केरळला वॉर झोन बनवतंय'राज्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरुन मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं की, आरएसएसनं केरळला वॉर झोन बनवून ठेवलं आहे. अशा प्रकारच्या हिंसक निदर्शनांना सरकारचा विरोध आहे.. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय लागू करण्याचा निर्णय घेत आहोत. दरम्यान, या हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत सात पोलीस वाहनं, 79 सरकारी बस आणि 39 पोलीस कर्मचाऱ्यांवर निशाणा साधण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळेस दिली.
कोण होते चंदन उन्नीथन ?चंदन उन्नीथन हे ‘शबरीमला कर्म समिती’ चे कार्यकर्ते होते. शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला उन्नीथन विरोध दर्शवत होते. बुधवार येथे CPIM-BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीदरम्यान उन्नीथन जखमी झाले. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आज कित्येक हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यात बंदची हाक दिली आहे. अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीला अय्यप्पा भक्त, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र विरोध चालवला आहे. याच पार्श्वभूमीवर, बुधवारी राज्य सचिवालयाबाहेर जवळपास 5 तास हिंसक निदर्शनं सुरू होती. यामध्ये माकपा-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेकीची घटना घडली.
अय्यप्पा मंदिरा प्रवेश करणाऱ्या महिला कोण?
कनकदुर्गा (वय 44 वर्ष) आणि बिंदू (वय 42 वर्ष) अशी या महिलाभक्तांची नावे आहेत. पारंपरिक पद्धतीचे काळ कपडे परिधान करुन या महिलांनी बुधवारी पहाटे 3.38 वाजण्याच्या सुमारास अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला. दर्शनानंतर कनकदुर्गा आणि बिंदू या दोघींना पोलीस संरक्षणात अज्ञात स्थळी नेण्यात आले. बिंदू प्राध्यपिका आणि कोळीवाडा येथील कम्युनिस्ट कार्यकर्त्या असून, त्यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कनकदुर्गा यां मल्लपूरम येथे नागरी पुरवठा खात्यात कर्मचारी आहेत.
महिला प्रवेशानंतर मंदिराचे शुद्धीकरण
या महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर येथील मुख्य पुजाऱ्यानं सर्व भक्तांना बाहेर काढले आणि शुद्धीकरणासाठी मंदिर एक तासभर बंद ठेवले. या पुजाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्रावणकोर देवस्थान मंडळाने म्हटले आहे.
620 किमी लांबीची महिला साखळी
या महिलांनी यापूर्वीही मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना अडवण्यात आले होते. संतप्त भक्तांच्या निदर्शनांमुळे न्यायालयाचा निकाल अंमलात येऊ शकला नव्हता. दर्शनासाठी आलेल्या महिलांना भक्तींनी पिटाळून लावले होते. या पार्श्वभूमीवर, लैंगिक समानता आणि प्रागतिक मूल्यांच्या रक्षणासाठी केरळमध्ये मंगळवारी 620 किमी लांबीची महिला साखळी गुंफण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलांनी अय्यप्पा मंदिरातील प्रवेशबंदी झुगारुन दिली.