नवी दिल्ली : केरळमधीलशबरीमला मंदिराचे दरवाजे मंडला पूजेनिमित्त शनिवारी संध्याकाळी पाच वाजता उघडण्यात आले. गेल्यावेळी महिलांच्या मंदिरप्रवेशाबाबत वाद असल्यामुळे संपूर्ण भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, यावेळी मंदिर परिसरात शांततेचे वातावरण आहे. दरम्यान, मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या दहा महिलांना पोलिसांनी रोखल्याचे सांगण्यात येते.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महिलांना मंदिर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी या दहा महिलांची ओळखपत्रे तपासल्यानंतर मंदिरात जाण्याची परवानगी नाकारली. मंदिराच्या परंपरेनुसार, 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मनाई आहे. पोलिसांनी मंदिर प्रवेश नाकारलेल्या दहा महिलांपैकी तीन महिल्या आंध्र प्रदेशच्या विजयवाडाहून आल्या होत्या आणि भाविकांच्या एका जत्थात सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना असलेली प्रवेशबंदी सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबर 2018 रोजी रद्द केली होती. यानंतर या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या गुरुवारी पुनर्विचार याचिकांवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे प्रकरण आता आणखी मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून यावर निर्णय होणार आहे. तसेच, मंदिरातील महिलांचा प्रवेश कायम ठेवण्यात आला आहे.