तिरुवनंतपुरम : केरळमधील शबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात 'श्री चित्रा अत्ता तिरुनाल' विशेष पूजा सुरु झाली आहे. ही पूजा मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. यानंतर पुन्हा मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला पोलीस मंदिराच्या सन्निधानममध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
सोमवारी संध्याकाळी दर्शन सुरु झाल्यानंतर भाविकांनी पवित्र पतिनेट्टन पाडीवर चढून मंदिरात पूजेसाठी पोहोचले. 'अताझा पूजा' करण्याठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी संध्याकाळपर्यंत इरुमेली येथे आलेल्या भाविकांना सकाळी पांबा आणि सन्निधानममध्ये जाऊ दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या काही भाविकांनी 'अय्यप्पा शरणम' च्या घोषणा दिल्या. एका भाविकांने सांगितले की, आम्ही गेल्या रात्रीपासून वाट पाहत आहोत. आम्हाला सांगितले की सकाळी सहा वाजता मंदिरात जाण्याची परवानगी मिळेल. आम्ही भगवान अय्यपा मंदिरात पूजा करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे.
दरम्यान, काही हिंदू संघटनांनी शबरीमालाच्या वार्तांकनासाठी महिला पत्रकारांना पाठवू नका, असे आवाहन केले आहे. शबरीमाला मंदिरातील 10 ते 50 या वयोगटातील महिलांची प्रवेशबंदी न्यायालयाने रद्द केली. तरी गेल्या महिन्यात मंदिर पाच दिवसांसाठी उघडले तेव्हा आंदोलकांनी या वयाच्या एकाही महिलेला मंदिरापर्यंत जाऊ दिले नव्हते. महिला पत्रकारांनाही हुल्लडबाजी करून परत पाठविण्यात आले होते. आता दोन दिवसांसाठी मंदिर पुन्हा उघडणार असताना विश्व हिंदू परिषद व हिंदू ऐक्यवेदी यासारख्या संघटनांची संयुक्त आघाडी असलेल्या शबरीमाला कर्म समितीने संपादकांना पत्र पाठविले. त्यात म्हटले आहे की, 10 ते 50 या वयोगटातील महिला पत्रकार मंदिर परिसरात आल्या तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.