नवी दिल्ली : केरळमधील सबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. या वादात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे.
येत्या 17 नोव्हेंबरला तृप्ती देसाई यांनी मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र पाठविले असून, या पत्रात त्यांनी सुरक्षेची मागणीही केली. मात्र, त्यांनी पाठविलेल्या पत्राला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.याविषयी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितले की, केरळ सरकारकडून माझ्याकडे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याला मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक जबाबदार असतील.
दरम्यान, आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय 28 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने दिला होता. या निकालाच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पाळला होता. तसेच, काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. दाखल करण्यात आलेल्या या पुनर्विचार याचिकांवर 22 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.