तिरुवनंतपुरम : केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन वाद सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांच्या महिलांना या मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतरही पन्नाशीच्या आतील महिलांना तथाकथित भक्तांनी विरोध केला आहे. दुसरीकडे महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून चर्चा होताना दिसत आहे. असे असताना एका नऊ वर्षांच्या मुलीने ठराविक वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याला सहमती दर्शविली आहे. यासंबंधी एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहे. यामध्ये नऊ वर्षांच्या मुलीने मंदिर परिसरात पोस्टर दाखविले. यावर तीने जेव्हा 41 वर्षांनतर 50 वर्षांची होईल, त्यावेळीच मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाईन, असे म्हटले आहे.
रविवारी (दि.21) नऊ वर्षांची पद्मापूर्णी मंदिरात दर्शन घेण्यासाठी हातात एक पोस्टर घेऊन दाखल झाली. यावेळी या पोस्टरवर लिहिले होते की, मी नऊ वर्षांची आहे. शबरीमालाला भेट देण्याची ही तिसरी वेळ आहे. आता याठिकाणी मी 50 वर्षांची झाल्यानंतर येणार आहे. दरम्यान, पद्मापूर्णीच्या सांगण्यावरुन असे समजते की, ती मंदिराबाबत लोकांमध्ये असलेली परंपरा कायम ठेवण्याचा संदेश देत आहे. यासाठी तिच्या कुटुंबातील लोक पोस्टर घेऊन मंदिरात दाखल झाले आहेत. यावेळी पद्मापूर्णा म्हणाली, 'मी आता 40 वर्षे शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकणार नाही, यावर मी अजिबात दु:खी नाही'.
दरम्यान, शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या मुली व महिलांना जाण्यास बंदी आहे. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवून मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. मात्र, येथील भाविकांनी महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.