Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे काही वेळातच उघडणार, परिसरात कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:03 AM2018-10-17T08:03:15+5:302018-10-17T08:30:23+5:30

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला विरोध, परिसरात कडेकोट बंदोबस्त

Sabarimala Temple : sabarimala temple doors opens in few hours protest and tension outside temple | Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे काही वेळातच उघडणार, परिसरात कडेकोट बंदोबस्त

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे काही वेळातच उघडणार, परिसरात कडेकोट बंदोबस्त

Next

तिरुअनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिराचे द्वार काही वेळात पारंपरिक मासिक पूजेसाठी उघडण्यात येणार आहेत. मात्र, मंदिरातील महिला प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराबाहेरील निदर्शनं, मोर्चे आणि तणाव पाहता मंदिराचे द्वार कधी उघडणार याबाबतची माहिती निश्चित माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. 

भगवान अयप्पांच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना भेदभाव न करता प्रवेश देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं 28 सप्टेंबरला दिला. या ऐतिहासिक निर्णयानंतर सबरीमाला मंदिर आज प्रथमच खुले करण्यात येत आहे.पण या निर्णयाला विरोध करत विविध संघटनांनी निदर्शनं सुरू केली आहेत. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले की, फेरविचार याचिका दाखल केली जाणार नाही व कोणालाही मंदिर प्रवेशास प्रतिबंध करणार नाही. सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातील. न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केरळमध्ये अनेक मोर्चे निघालेले आहेत. सरकार निकालाचे पालन करणार असे म्हणत असले तरी भाजपा व काँग्रेस यांनी भक्तांच्या व प्रवेशबंदीच्या बाजूने उभे राहण्याचे ठरविल्याने निर्णय अमलात आणताना अडचणी येऊ शकतात. पोलीस अधीक्षक तिथे तळ ठोकून आहेत. 

महिलांना अडविणे सुरू
निलक्कलपासून १५ किमीवर असलेल्या पंबा येथून शबरीमालाचा डोंगर पायी चढण्यास सुरुवात होते. मंगळवारीच अनेक भाविक तिथे महिलांची वाहने अडवून त्यांना परत पाठविताना दिसत होते. महिला पत्रकारांनाही अडविले गेले. विशेष पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू होते.



 



 


का होती मंदिरात प्रवेशबंदी? 
केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. 

सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रह्मचारी असल्यानं या मंदिरात 10 ते 50 वर्षं वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता, गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनानं ही भूमिका घेतली होती. तसेच सबरीमाला मंदिराकडून महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली होती. सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. 

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. ''महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातायत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही. '', असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते.

Web Title: Sabarimala Temple : sabarimala temple doors opens in few hours protest and tension outside temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.