तिरुवनंतपुरम : केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरात महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण सुरु आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, येथील निल्लकल, पंपा, एल्वाकुलम, सन्निधनम या भागात कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
आज शबरीमाला संरक्षण समितीने आज गुरूवार 12 तासांच्या बंदची घोषणा केली आहे. भाजपा, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि अन्य स्थानिक संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे. काँग्रेस या बंदमध्ये सहभागी होणार नाही मात्र, राज्यात विरोध प्रदर्शन करणार आहे.महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिर महिनाभराच्या धार्मिक विधींसाठी बुधवारी सायंकाळी प्रथमच प्रचंड तणावाच्या वातावरणात उघडले. मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकरणाऱ्यांनी बुधवार सकाळपासूनच मंदिर परिसरात जोरदार निदर्शने केली होती.
प्रथा आणि परंपरा पाळून फारशा महिलांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही. मात्र कुटुंबीयांसमवेत ज्या काही महिला जाताना आढळल्या, त्यांची वाहने हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्या महिलांना खाली उतरविले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निलक्कल येथे बुधवारी सकाळी वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकारांनाही निदर्शकांनी धक्काबुक्की व मारहाण केली. आंध्र प्रदेशातून मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या दोन महिलांनाही परत जावे लागले.