तिरुवनंतपुरम - महिलांच्या मंदिर प्रवेशास स्थानिक भाविकांकडून होत असलेला प्रचंड विरोध, मंदिराच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती या पार्श्वभूमीवर अखेर बुधवारी संध्याकाळी कडेकोट बंदोबस्तात सबरीमाला मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पंपा, निलक्कल, सन्नीधनम आणि इलावुंगल येथे हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
भगवान अयप्पांच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना भेदभाव न करता प्रवेश देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला. या ऐतिहासिक निर्णयानंतर सबरीमाला मंदिर आज प्रथमच खुले करण्यात येत आहे.पण या निर्णयाला विरोध करत विविध संघटनांनी निदर्शनं सुरू केली आहेत. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, सबरीमाला मंदिरात विशिष्ट वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याविरोधात सुरू अकलेल्या आंदोलनादरम्यान, काही भाविकांना मारहाण झाली. तसेच वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनाही धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामागे भाजपा आणि संघाचा हात असल्याचा आरोप केरळ सरकारमधील मंत्री इपी जयराजन यांनी केला आहे.
महिलांना अडविणे सुरूनिलक्कलपासून १५ किमीवर असलेल्या पंबा येथून शबरीमालाचा डोंगर पायी चढण्यास सुरुवात होते. मंगळवारीच अनेक भाविक तिथे महिलांची वाहने अडवून त्यांना परत पाठविताना दिसत होते. महिला पत्रकारांनाही अडविले गेले. विशेष पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू होते.का होती मंदिरात प्रवेशबंदी? केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रह्मचारी असल्यानं या मंदिरात 10 ते 50 वर्षं वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता, गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनानं ही भूमिका घेतली होती. तसेच सबरीमाला मंदिराकडून महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली होती. सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. ''महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातायत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही. '', असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते.