कोची - भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मंगळवारी (26 नोव्हेंबर) सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज पहाटे कोची विमानतळावर आगमन झाल्यानंतर देसाई सबरीमाला मंदिराकडे रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत बिंदू अम्मिनी या कार्यकर्त्याही आहेत. बिंदू यांनी गेल्यावर्षी मंदिरप्रवेशाचा प्रयत्न केला होता. बिंदू यांनी कोची आयुक्त कार्यालयाबाहेर त्यांच्या चेहऱ्यावर कोणीतरी मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती देसाई आणि त्यांच्या काही सहकारी आज सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान त्यांना सबरीमाला मंदिरात प्रवेश द्यायचा नाही याची तयारी आंदोलकांनीही केली आहे. याच दरम्यान आयुक्त कार्यालयाबाहेर उपस्थित असलेल्या काही लोकांसोबत बिंदू अम्मिनी यांचा मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद झाला. त्यानंतर बिंदू यांच्या चेहऱ्यावर मिरची पूड फेकण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
संविधान दिनी सबरीमाला मंदिरात प्रवेश करणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार किंवा पोलीस मंदिरात प्रवेश करण्यापासून आम्हाला अडवू शकत नाहीत. पोलीस संरक्षण दिले अथवा दिले नाही तर आम्ही प्रवेश करणार असं देखील म्हटलं आहे. तसेच जर कुणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्टाचा अवमान झाल्याप्रकरणी आम्ही कोर्टात दाद मागू, असेही त्या म्हणाल्या. माझ्या मंदिरप्रवेशाची माहिती मी केरळ राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना दिलेली आहे. आम्हाला संरक्षण पुरवणे ही त्यांची जबाबदारी असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
केरळचे सबरीमालातील आय्यप्पा मंदिर दोन महिन्यांसाठी खुले झाले असून भाविक दर्शनासाठी प्रचंड गर्दी करत आहेत. या मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश द्यावा या निकालाच्या फेरविचारास केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरात होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंदिर पुन्हा खुले झाल्यापासून दोन दिवसांत 70 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या मंदिर संकुलात भाविकांसाठी अपुऱ्या सुविधा असल्याची तक्रार अनेकांनी केली. 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांनाही आय्यप्पा मंदिरात प्रवेश द्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याला विरोध करण्यासाठी गेल्या वर्षी मंदिर परिसरात भाविकांनी जोरदार निदर्शने केली होती. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. भाविकांची बारकाईने तपासणी केल्यानंतरच पोलीस त्यांना मंदिरात प्रवेश देत होते.