तिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेला वाद आता आणखी चिघळणार आहे. भक्तांच्या निदर्शनांमुळे 10 ते 50 वर्षे वयोगटाच्या महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जावा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी येत्या शनिवारी (17 नोव्हेंबर) मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा निर्धार केला आहे.
सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच देसाईंना विरोध करण्यासाठी केरळमधील नागरिकही विमानतळाबाहेर दाखल झाले आहेत. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच थांबावे लागले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तृप्ती देसाई यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर राज्य सरकार ठाम आहे. मात्र विरोधकांसह सर्वांशी चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष
महिलांच्या मंदिर प्रवेशाचा निर्णय लागू करण्यास न्यायालयाकडून सरकारने मुदत वाढवून घ्यावी. यासंदर्भातील आव्हान याचिकांची सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे तोवर या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशा विरोधकांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याचे काँग्रेसचे नेते रमेश चेनिथला यांनी म्हटले आहे.