नवी दिल्ली - केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाचा वाद संपता संपत नाहीय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. सबरीमाला मंदिर वादावर बोलताना स्मृती इराणी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सबरीमाला मंदिर वादासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना इराणी म्हणाल्या की, ''मला मंदिरात पूजा करण्याचा अधिकार आहे, मात्र ते अपवित्र करण्याचा अधिकार नाही. मी सध्या केंद्रात मंत्री असल्याच्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण, रक्तानं माखलेले सॅनिटरी पॅड घेऊन तुम्ही आपल्या मित्राच्या घरी जाणार का?. तर मग देवाच्या मंदिरात जाताना त्याच अवस्थेत कशा काय जाऊ शकता?, असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. दरम्यान, वादग्रस्त विधानानंतर 'हे माझं वैयक्तिक मत' असल्याचेही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले.
का होती मंदिरात प्रवेशबंदी? केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे.
सुप्रीम कोर्टानं दिला ऐतिहासिक निर्णय
सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. या प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणीत कोर्टानं मंदिर प्रवेशात भेदभाव केला जाऊ शकत नाही. देवाचं दर्शन हा महिलांचा घटनात्मक अधिकार आहे. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टानं मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला होता.