तिरुअनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिराचे दरवाजे आज सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले होणार आहे. मंदिराचे द्वार पारंपरिक मासिक पूजेसाठी उघडण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आज पहिल्यांदाच सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. पण विरोध, मोर्चे, निदर्शनं पाहता महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार का?, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांकडून कडाडून विरोध दर्शवला जात आहे. काहींनी तर आत्महत्या करण्याचीही धमकी दिली आहे.
सबरीमाला मंदिरसंबंधीत 10 महत्त्वपूर्ण गोष्टी1. सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाच्या निर्णयाला वाढता विरोध पाहता सरकार आणि प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जवळपास 1 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 800 पुरुष आणि 200 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
2. काही संघटना आणि राजकीय पक्षांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत आहेत.
4. निलक्कलपासून १५ किमीवर असलेल्या पंबा येथून शबरीमालाचा डोंगर पायी चढण्यास सुरुवात होते. मंगळवारीच अनेक भाविक तिथे महिलांची वाहने अडवून त्यांना परत पाठवताना दिसत होते. महिला पत्रकारांनाही अडविले गेले. विशेष पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू होते.
5. सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही. '', असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते.
6. पूजा करण्याचा अधिकार सर्व भाविकांना आहे, असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं.
7. फेरविचार याचिका दाखल केली जाणार नाही व कोणालाही मंदिर प्रवेशास प्रतिबंध करणार नाही. सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातील, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले.
8. सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध केरळमध्ये अनेक मोर्चे निघत आहेत. सरकार निकालाचे पालन करणार असे म्हणत असले तरी भाजपा व काँग्रेस यांनी भक्तांच्या व प्रवेशबंदीच्या बाजूने उभे आहेत.
9. केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे.
10. धक्कादायक बाब म्हणजे सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाला विरोध करणाऱ्या आंदोलकांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.