नवी दिल्ली: केरळमधील शबरीमला येथील आय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेशासाठी दिलेली अनुमती यासंदर्भातील निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांवरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे.
गुरुवारी फेरविचार याचिकांवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे प्रकरण आता आणखी मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून यावर निर्णय होणार आहे. तसेच, मंदिरातील महिलांचा प्रवेश कायम ठेवण्यात आला आहे. यावेळी महिलांना मिळणारा प्रवेश हा फक्त मंदिरापुरताच मर्यादित नसून, यामध्ये मशिदी आणि पारशी प्रार्थना स्थळांचाही विचार करणे गरजेचे असल्याचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शबरीमला येथील आय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना असलेली प्रवेशबंदी सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबर 2018 रोजी रद्द केली होती. यानंतर या निर्णयाविरोधात 56 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याप्रकरणावरील सुनावणीचा निकाल सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी महिन्यात राखून ठेवला होता. त्यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस आरएफ नरीमन, जस्टिस एएम खानविलकर, जस्टिस डीवाय चंद्रचूड आणि जस्टिस इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे.