ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - काश्मीर खो-यात सुरु असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमध्ये दोन वेगवेगळया चकमकींमध्ये आठ दहशतवादी ठार झाले असून, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमदचाही त्यात समावेश आहे. शनिवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत सबजार अहमद ठार झाला. सबजार अहमदने काश्मीर खो-यात बुरहान वानीची जागा घेतली होती.
त्रालमध्ये अजूनही चकमक सुरु असून, इमारतीत लपून बसलेले तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी हे ऑपरेशन केले. सबजार आणि त्याचे साथीदार इमारतीत असल्याचे समजल्यानंतर लष्कराने त्या परिसराला वेढा घातला. ज्यामुळे सबजारला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.
आणखी वाचा
कोण आहे सबजार अहमद
- मागच्यावर्षी जुलै महिन्यात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुलचा मोहरक्या बुरहान वानी ठार झाल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली. सब डॉन म्हणून तो काश्मीर खो-यात ओळखला जायचा.
- सबजार अहमद बुरहान वानीचा विश्वासू साथीदार होता. त्याने दोन वर्ष वानीसोबत काम केले होते. हिजबुल मुजाहिद्दीनच्या संपूर्ण नेटवर्कची त्याला माहिती होती.
- सबजारचे एका मुलीवर प्रेम होते. तिच्या कुटुंबियांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर सबजार दहशतवादाकडे वळला.
- बुरहान वानीचा मोठा भाऊ खालिदची हत्या झाल्यानंतर आंदोलन सुरु असताना सबजारने एका अधिका-याच्या हातून बंदूक हिसकावली होती. त्यानंतर त्याला हिजबुलमध्ये महत्वाचे स्थान मिळाले होते.
- सबजार अहमदवर 10 लाखाचे इनाम होते.
रामपूरमध्ये सहा दहशतवादी ठार
दरम्यान जम्मू काश्मीरमधील रामपूर सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. शिवाय, घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या सहा दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले आहे. भारतीय जवानांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. दरम्यान, या परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. रामपूर सेक्टर हे बारामुल्ला आणि उरी क्षेत्राजवळ आहे.