मुंबई : देशातील प्रसीद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी सध्या चर्चेत आहे. त्यांनी भारतीय महिला पाश्चिमात्य कपड्यांना प्राधान्य देतात यावरून शनिवारी टीका केली होती. साडी नेसता येत नसेल तर लाज वाटायला हवी असं विधान सब्यसाची यांनी केलं होतं.
हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांना संबोधित करताना सब्यसाची यांना साडी नेसताना येणा-या अडचणींबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ''मला वाटतं जर तुम्ही मला साडी नेसता येत नाही असं म्हणाल, तर तुम्हाला लाज वाटायला हवी, साडी तुमच्या संस्कृतीचा एक भाग आहे''. असं सब्यसाची म्हणाले होते. जगातील सर्वात सुंदर पेहराव साडी आहे, साडी भारतीय महिलांची ओळख आहे, असंही ते म्हणाले.
साडी नेसता येत नसेल तर लाज वाटायला हवी या त्यांच्या विधानावर सध्या सोशल मीडियावर टीका सुरू आहे. अनेक महिलांनी सब्यसाचीच्या विधानावर टीका केली आहे. महिलांसाठी सगळं सोडून केवळ साडी महत्वाची आहे का ? असं ट्विट एका महिलेने केलं आहे. तर, महिलांनी बिअर प्यायल्यावर टीका करतात, जोरात हसल्यावर टीका करतात, जास्त शिक्षण घेतलं तरी टीका करतात आणि आता साडी नेसता येत नाही म्हणून टीका करतात असं ट्वीट अन्य एका महिलेने केलं आहे.
प्रसीद्ध कॉमेडियन तन्मय भट्ट यानेही सब्यसाची यांना ट्रोल करताना तुम्ही 80 हजाराची साडी विकतात म्हणून काही तरूणी साडी नेसत नाही असं ट्वीट केलं.