नवी दिल्ली : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूडच्या अभिनेत्री रेखा यांची राज्यसभेतील अकार्यक्षम इनिंग अखेर संपुष्टात आली आहे. या दोन्ही व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असली तरी राज्यसभेत मात्र त्यांनी अपेक्षाभंग केला. या दोघांनी फारच कमी दिवस राज्यसभेत उपस्थिती लावली होती आणि त्यामुळे ते टीकेचे धनी ठरत होते. सचिन आणि रेखा यांच्यासह राज्यसभेचे 85 सदस्य आज निवृत्त झाले.
आतापर्यंतच्या सहा वर्षांमध्ये या दोघांनी किती दिवस संसदेत उपस्थिती लावली आणि किती प्रश्न विचारले, हे सांगणे न बरे. कारण या दोघांचाही संसदेच्या कामकाजातील सहभाग अत्यल्प असाच राहीलेला आहे.रेखा यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. प्रश्न उपस्थित केला नाही म्हणजे त्यांचा केंद्र सरकारशी संवाद झालेला नाही. कारण जेव्हा कोणी खासदार प्रश्न विचारतात तेव्हा त्याचे उत्तर सरकारकडून दिले जाते आणि हे सारे राज्यसभेच्या संकेतस्थळावर पाहायला मिळते. बॉलीवूडमध्ये रेखा या चर्चेचा विषय असल्या तरी संसदेमध्ये त्यांच्या नावाची चर्चाच झाली नाही. 2017 साली संसदेमध्ये 373 दिवस कामकाज चालले, यामध्ये फक्त 18 दिवस रेखा उपस्थित राहील्या होत्या. म्हणजेच त्यांची उपस्थिती ही फक्त 5 टक्के एवढीच होती.रेखा यांनी संसदेत सहा वर्षांमध्ये एकही प्रश्न विचारला नाही, पण सचिनने आतापर्यंत 22 प्रश्न विचारले. सचिनला या प्रश्नांची उत्तरेही सरकारने दिली आहेत. पण या सहा वर्षांत संसदेमध्ये सचिनच्या नावाचीही जास्त चर्चा झाली नसल्याचेच समोर आले आहे.