ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही तरूणांच्या गळ्यातील ताईत असलेला, त्यांचे आदर्शस्थान असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सरकारने 'स्कील इंडिया' (कौशल्य विकास) योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवले आहे. जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचता यावे तसे कौशल्य विकासाप्रती तरूणांमध्ये जागरुकूता निर्माण करता यावी यासाठीच सरकारने सचिनला आपल्या 'I Support Skill India' या कॅम्पेनचा 'चेहरा बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, तरुणांना आपल्या पायावर उभे राहता यावे व रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कौशल्य विकास योजना सुरू केली असून २०२२ पर्यंत देशातील ४० कोटींहून अधिक तरूणांना कुशल बनवण्याचे लक्ष्य मंत्रालयासमोर आहे.
' मला जेव्हा या कॅम्पेनबाबात विचारणा करण्यात आली तेव्हा ही (योजना) एखाद्याच्या व्यक्तीगत विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण असून आपल्यायालाही त्याचे महत्व समजले पाहिजे, याची मला जाणीव झाली' असे सचिनने नमूद केले.
कौशल्य विकास तसेच उद्यमशीलता विभागाचे मंत्री (स्वतंत्र प्रभार) राजीवप्रताप रूडी यांच्यानुसार, ' सचिन हा आपल्या काळातील शानदार व्यक्तींपैकी एक असून तो कौशल्याची एक उत्तम व्याख्या आहे. तो जगाचा आदर्श असून आपल्या कौशल्याने त्याने क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले व अनेक पिढ्यांसाठी आदर्श बनला.'
कौशल्य विकासासाठी आदर निर्माण करणे गरजेचे असून या कॅम्पेनद्वारेही हाच विचार मांडण्यात आला आहे. हे कॅम्पेन समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच कुशल भारत बनवण्याच्या लक्ष्यातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे' असेही रूडी यांनी सांगितले.