Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 03:02 PM2020-07-14T15:02:12+5:302020-07-14T15:04:33+5:30
सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे.
जयपूर: राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ राहिलेल्या राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसने हटविल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर काही तात्काळ बदल केले आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये उपमुख्यमंत्री असल्याचे लिहिले होते. तसेच राजस्थान राज्याचे प्रदेशाध्यक्ष असल्याचे देखील लिहिले होते. मात्र आता सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदाची असलेली ओळख पुसून टाकली आहे.
Sachin Pilot changes his bio on Twitter (pic 1) after being removed as Rajasthan Deputy Chief Minister and state Congress unit chief (Pic 2: earlier Twitter bio). pic.twitter.com/ro3UWqOdvN
— ANI (@ANI) July 14, 2020
तत्पूर्वी, सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रिपदं काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. 'पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपानं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,' अशा शब्दांत सुरजेवाला यांनी सचिन पायलट आणि भाजपा यांचा समाचार घेतला.
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षानं कारवाई केली आहे. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. 'आम्ही गेल्या ७२ तासांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. के. सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचं सांगण्यात आलं. काही मतभेद असल्यास संवादाच्या माध्यमातून सोडवता येईल, असं आवाहन करण्यात आलं. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही,' असं सुरजेवाला यांनी सांगितलं.
#WATCH Congress party has decided to remove Sachin Pilot as Deputy CM and Rajasthan PCC Chief. Vishvender Singh & Ramesh Meena removed as Ministers: Congress leader Randeep Singh Surjewala #Rajasthanpic.twitter.com/sJHmE9kI3T
— ANI (@ANI) July 14, 2020
सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला. सचिन पायलट करत असलेली कृती स्वीकारार्ह नाही. त्यामुळे आम्हाला अतिशय दु:खद अंतकरणानं काही निर्णय घ्यावे लागले, असं म्हणत सुरजेवाला यांनी सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.