भाजपात येण्यासाठी सचिन पायलट यांनी दिली होती 'एवढ्या कोटींची' ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 09:15 PM2020-07-20T21:15:57+5:302020-07-20T21:19:03+5:30
राजस्थानमधील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना मात दिली.
जयपूर - राजस्थानमधील सत्तासंघर्षात पायलट यांच्यावर आघाडी घेतल्यानंतर आता अशोक गहलोत हे त्यांच्याविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. गेहलोत म्हणाले की, आम्ही सचिन पायलट यांच्याबाबत कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. राजस्थान हे असं राज्य असावं जिथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची मागणी झाली नाही. ते बिनकामाचे आहेत, अकार्यक्षम आहेत, हे आम्हाला माहीत होतं. मात्र आम्ही त्यांच्याविरोधात कधी काही बोललो नाही. आम्ही सर्वांनी त्यांना सन्मान दिला, असे गहलोत यांनी म्हटलं. त्यानंतर, आता एका काँग्रेसआमदाराने थेट सचिन पायलट यांचं नाव घेऊन भाजपात येण्यासाठी चक्क कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
राजस्थानमधील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना मात दिली. त्यामुळे, काँग्रेसचे आमदार त्यांच्यासमवेत राहिल्याने, पायलट यांचे स्वप्न भंग झाले. त्यानंतर, काँग्रेसने सचिन पायलट यांच्याकडील उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले. त्यामुळे, त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून जाहीरपणे टीका करण्यात येत आहे. तर, एका काँग्रेस आमदाराने त्यांच्यावर चक्क आमदाराफोडीचा आरोप केला आहे. राजस्थानमधील काँग्रेस आमदार गिरीराज सिंह मलिंगा यांनी थेट आरोपच केला आहे. सचिन पायलट यांनी भाजपात येण्यासाठी मला 35 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असे मलिंगा यांनी म्हटले. तसेच, मी ही ऑफर धुडकावून लावली असून मी यासंदर्भात मुख्यमंत्री गेहलोत यांनाही सांगितलं होतं. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी माझी समजूत काढताना, थोड कमी-जास्त होत असतं, सर्वकाही ठिक होईल, असे म्हटल्याचेही मलिंगा यांनी म्हटले.
दरम्यान, पायलट अकार्यक्षम आणि बिनकामाचे असल्याची टीका गेहलोत यांनी केली होती. या टीकेला पायलट यांनी उत्तर दिलं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. या आरोपांमुळे मला दु:ख झालं आहे. पण त्यामुळे मला धक्का बसलेला नाही, असं पायलट म्हणाले. माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांना भाग म्हणून माझ्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. यापुढेही असे आरोप होत राहतील. मात्र मी आत्मविश्वास किंचितही ढळू देणार नाही, असं पायलट यांनी म्हटलं. आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचं पायलट म्हणाले.