नवी दिल्लीः मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या भाजपाच्या तीनही गडांवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यशस्वी झालेत. परंतु, आता राजस्थानचा राजा - अर्थात मुख्यमंत्री निवडताना त्यांच्या नेतृत्वाचा कस लागताना दिसतोय. ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि तरुण-तडफदार सचिन पायलट हे दोन नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असून दोघांचेही समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. मुख्यमंत्रिपदाची माळ सचिन पायलट यांच्या गळ्यात पडली नाही, तर काँग्रेस सोडण्याची धमकीच राजस्थानातील आमदार पी आर मीणा यांनी दिली आहे.
राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत सचिन पायलट यांनी सर्वाधिक मेहनत केलीय. त्याचं बक्षीस त्यांना मिळायलाच हवं. गहलोत यांनी आत्तापर्यंत काय केलं? राजस्थानातील ७० ते ८० टक्के आमदार पायलट यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांनाच नेतृत्व दिलं गेलं पाहिजे, असं पी आर मीणा यांनी निक्षून सांगितलं.
मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांच्या नावाची घोषणा काँग्रेसनं बुधवारी केली. तिथे ज्योतिरादित्य शिंदे यांचं नावही चर्चेत होतं. त्यात बहुधा काँग्रेसनं अनुभवाला पसंती दिली. आता ते राजस्थानमध्ये काय करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मध्य प्रदेशचा अनुभव बघता, राजस्थानचं मुख्यमंत्रिपद अशोक गहलोत यांना दिलं जाऊ शकतं. त्यामुळेच सचिन पायलट यांचे समर्थक आक्रमक झालेत.
दरम्यान, सचिन पायलट आणि गहलोत या दोघांनाही काँग्रेसश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावून घेतलं असून संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. इकडे राजस्थानात दोघांचेही समर्थक आपापल्या नेत्याच्या नावाने जयजयकार करत आहेत. सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष असून त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा निवडणूक लढवली होती.