नवी दिल्ली: कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी आल्यानंतर दोन नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. एका नेत्याचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे, तर दुसऱ्या नेत्याचे नाव यादीत टाकण्यात आले आहे. अलीकडेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव या यादीत आहे. तसेच, काँग्रेसचे प्रसिद्ध युवा नेते सचिन पायलट यांचे नाव या यादीत नाही. रा
राजस्थानमध्ये पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. काही दिवसांपूर्वीच पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात एक दिवसांचे उपोषण केले होते. त्यांच्या या उपोषणामुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळेच त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, यादीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आहे. त्यांच्यासोबतच काँग्रेस मुख्यमंत्र्यांमध्ये भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंग सुखू (हिमाचल प्रदेश) यांचाही यादीत समावेश आहे.
2018 च्या कर्नाटक निवडणुकीत सचिन पायलट काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत होते, पण यावेळी ते स्टार प्रचारक नाहीत. स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, पी चिदंबरम, जयराम रमेश आणि प्रियांका गांधी वड्रा यांचा समावेश आहे. सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, वीरप्पा मोईली, एमबी पाटील आणि सतीश जारकीहोळी हेदेखील पक्षाचा प्रचार करणार आहेत.