जयपूर : या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पण, त्यापूर्वीच राज्यातील राजकारण तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारविरोधात उपोषणाला बसले आहेत. पायलट यांच्या उपोषणाला पक्षश्रेष्ठींकडून विरोध होता. काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी या उपोषणाला पक्षविरोधी कृत्यही म्हटले, तरीदेखील पायलट उपोषणाला बसले. त्यांच्याविरोधात पक्ष काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
बॅनरवरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो गायबपायलट सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे उपोषण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने पायलट समर्थक हुतात्मा स्मारकावर जमले आहेत. विशेष म्हणजे, परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर राहुल गांधी आणि सोनिया यांच्यासोबत काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याचे फोटो नाहीत. पायलट यांच्या उपोषणासाठी हुतात्मा स्मारकावर स्टेज उभारण्यात आला असून, तिथे फक्त महात्मा गांधींचा फोटो लावण्यात आला आहे.
राज्यभरातून समर्थक आलेविशेष म्हणजे रविवारीच पायलट यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. पायलट यांच्या उपोषणात सामील होण्यासाठी राज्यभरातून त्यांचे समर्थक जयपूरमधील हुतात्मा स्मारकावर पोहोचले आहेत. यावेळी मंचावर पायलटभोवती काही माजी आमदार आणि तरुण चेहरेही दिसत आहेत. दुपारी उपोषण संपल्यानंतर पायलट आपली पुढील रणनीती स्पष्ट करतील. आज पायलट काही मोठी घोषणा करू शकतात, अशी माहिती आहे.
उपोषण कशासाठी? रविवारी जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सचिन पायलट यांनी सीएम अशोक गेहलोत यांच्यावर मागील वसुंधरा राजे सरकारच्या काळात उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला. पायलट म्हणाले की, केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे आणि आमच्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली जात आहे, परंतु राजस्थानमध्ये आमचे सरकार एजन्सीचा कोणताही वापर करत नाही. राजस्थानमध्ये 2018 च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली होती, परंतु आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. यावरुन लोक वसुंधरा राजे आणि गेहलोत यांच्यात काही मिलीभगत असल्याचे म्हणू शकतात, असे पालयट म्हणाले.