नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. मात्र राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटण्याची वेळ दिली नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यावर राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे युवानेते सचिन पायलट यांनी ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.
ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजप प्रवेश दुर्दैवी आहे. पक्षांतर्गत वाद सोडवता येऊ शकतात, असं सचिन पायलट यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ज्योतिरादित्य शिंदेंनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे. मला असं वाटत पक्षात चर्चा करून काही वाद मिटवता येऊ शकतात. सचिन पायलट यांच्याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका केली होती.
संधीसाधू लोक आधीच पक्षातून निघून गेले असते तर बर झालं असतं अशी टीका अशोक गेहलोत यांनी नाव न घेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर केली. काँग्रेसने त्यांना बरच काही दिलं आहे. वेगवेगळ्या पदांवर ठेवले. खासदार बनवले. केंद्रीयमंत्रीपद दिले. मात्र संधी मिळताच त्यांनी आपला मुळस्वभाव दाखवला. जनता यांना माफ करणार नाही, अशी टीका गेहलोत यांनी केली. या व्यतिरिक्त काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील शिंदे यांच्यावर टीका केली.