-व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची काँग्रेस संघटनेमधील भूमिका विस्तारत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा कडाडून विरोध असतांना पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी राजस्थानमध्येही लक्ष घालण्यास सुरू केले आहे. सचिन पायलट यांच्या समर्थकांना राजस्थान मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस असून उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या प्रभारी आहेत; परंतु, त्यांच्याकडे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणेच श्रेष्ठी म्हणून पाहिले जाते.
राजस्थानच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी के. सी. वेणुगोपाल, अजय माकन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची बुधवारी बैठक बोलाविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. गेहलोत हे या प्रस्तावाने अस्वस्थ आहेत. पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरुद्ध भूमिका घेतली बंडाचे निशाण फडकावले, तेव्हा ते पायलट यांच्याशी निष्ठावंत राहिले होते. मुख्यमंत्र्यांवर अंकुश ठेवणे, याच दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेल्या पुढाकाराकडे पक्ष वर्तुळात पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका गांधी यांच्या प्रचाराने उत्तर प्रदेशात पक्ष संघटनेला चैतन्य लाभले तर, उत्तर प्रदेशात कमी आमदार असतानाही अन्य पक्षांना काँग्रेसला गंभीरतेने घेणे भाग पडेल.