सचिन पायलट होणार राष्ट्रीय सरचिटणीस; पायलट यांच्या तीन मागण्या मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:28 AM2023-07-07T10:28:31+5:302023-07-07T10:28:40+5:30
सचिन पायलट यांच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
- आदेश रावल
नवी दिल्ली : दिल्लीत राजस्थान काँग्रेसबाबत मॅरेथॉन बैठक घेण्यात आली असून, लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व सचिन पायलट यांच्यातील वाद मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रभारी सुखविंदर सिंह रंधावा यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. सचिन पायलट यांना राष्ट्रीय सरचिटणीस केल्यानंतर ते काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होतील व त्यांना केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्यही केले जाईल. याचबरोबर पायलट यांना राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार समितीचे अध्यक्ष केले जाणार आहे.
सचिन पायलट यांच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. याच मागण्यांसाठी त्यांनी जयपूरमध्ये एक दिवसाचे उपोषण केले होते व अजमेर ते जयपूर पाच दिवसांची पदयात्रा काढली होती. आता राजस्थान सरकार पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी कायदा करणार आहे. वसुंधरा राजे व भाजपच्या भ्रष्टाचाराची चौकशी होईल व आयपीएससीमध्ये योग्य ते बदल केले जाणार आहेत. लवकरच काँग्रेस कार्यकारिणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गठन होणार आहे व यात या सर्व घोषणा होतील.