मणिपूर आणि इतर ईशान्येकडील राज्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये मतभेद पाहयला मिळतात. नुकतेच मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांकडून संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. दरम्यान, सोशल मीडियावर काँग्रेस नेते सचिन पायलट आणि भाजप नेते अमित मालवीय यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मिझोराममध्ये १९६६ मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात सचिन पायलट यांच्या वडिलांचाही हात असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला होता. याला सचिन पायलट यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अमित मालविय यांनी १३ ऑगस्टला एक ट्विट केले होते. यामध्ये 'राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी भारतीय हवाईदलाचे विमान उडवत होते. त्यांनी ५ मार्च १९६६ रोजी मिझोरामची राजधानी ऐझॉलवर बॉम्बहल्ला केला होता. त्यानंतर राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी काँग्रेसच्या तिकीटावर मंत्री झाली. इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकारणात घेऊन बक्षीस दिले हे स्पष्ट आहे. ज्यांनी आपल्याच लोकांवर बॉम्बहल्ला केला त्यांना सन्मान देण्यात आला, असा दावा अमित मालविय यांनी केला होता.
अमित मालवीय यांच्या या दाव्याला सचिन पायलट यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कागद दाखवत सचिन पायलट यांनी ट्विटरवर म्हटले की, त्यांचे वडील राजेश पायलट हे २९ ऑक्टोबर १९६६ रोजी हवाई दलात नियुक्त झाले होते. त्यामुळे ५ मार्च १९६६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा दावा पूर्णपणे निराधार आहे. तसेच, ८० च्या दशकात मिझोराममध्ये युद्धविराम आणि शांतता करार होण्यात माझ्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही सचिन पायलट यांनी म्हटले आहे. याशिवाय, सचिन पायलट यांनी असा दावाही केला की, हवाई दलाचा पायलट या नात्याने माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला होता, पण १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले, तेव्हा ते पूर्व पाकिस्तानमध्ये होते. म्हणजेच मिझोरामबाबत तुमचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.
दरम्यान, मिझोरामचा हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास ठरावादरम्यान दिलेल्या भाषणानंतर निर्माण झाला आहे. आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोप केला होता की, मिझोरममध्ये काँग्रेसने आपल्याच नागरिकांवर हवाई दलाने हल्ला केला होता, मिझोरमचे लोक काय आपल्या देशाचे नागरिक नाहीत. आजही मिझोराममध्ये ५ मार्च हा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेसवर नरेंद्र मोदींनी हा हल्लाबोल केला होता. यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.