नवी दिल्ली: पक्षाध्यक्षाच्या निवडीवरुन राजस्थानकाँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. गांधी घराण्याशी जवळीक असलेले अशोक गेहलोत यांच्या 80 समर्थकांनी सभापती सीपी जोशी यांच्याकडे राजीनामा दिला आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास आमदारांनी विरोध दर्शवला आहे. सीएम अशोक गेहलोत यांना राजस्थानची जबाबदारी सचिन पायलटांकडे जाऊ द्यायची नाही, हेच यावरुन स्पष्ट होत आहे.
काँग्रेसमध्ये बंडाचे वारे...विशेष म्हणजे, 2019 मध्ये सचिन पायलटांना पाठिंबा देणाऱ्या 28 आमदारांच्या बंडाचा सामना काँग्रेसला करावा लागला होता. आता मुख्यमंत्री गेहलोत यांच्या बाजुने बंडखोरी झाली आहे. काँग्रेसला राजस्थानमध्ये या दोन्ही नेत्यांपैकी एकाही नेत्याला नाराज करुन चालणार नाही. गुज्जर समाजातून येणारे सचिन पायलट काँग्रेसचा तरुण चेहरा आहेत. त्यांना राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनवल्यानंतर राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 5 टक्के असलेल्या गुज्जर समाजाचा मोठा भाग काँग्रेसच्या बाजूने आला.
पायलट गुज्जर चेहराराज्यात गुज्जर ही भाजपची व्होट बँक होती. पण, सचिन पायलट यांच्या नेतृत्वात 2018 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यात गुज्जरांनी मोठी भूमिका पार पाडली. भाजपने 9 गुर्जर उमेदवारांना तिकीट दिले होते, त्यापैकी एकही विजयी होऊ शकला नाही. तर काँग्रेसने 12 गुज्जर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 7 विजयी झाले. काँग्रेसच्या खात्यात गुज्जर मत जाण्याचे मुख्य कारण सचिन पायलट ठरले.
गेहलोत ओबीसी चेहरादुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत माळी समाजातून येतात. गेहलोत यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहिले जाते. अशोक गेहलोत यांनीच राजस्थानच्या राजपूत-ब्राह्मण आणि जाटांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करत तीनदा मुख्यमंत्री बनले. अशोक गेहलोत यांना काँग्रेसचे ट्रबलशूटरही म्हटले जाते. गेल्या गुजराज विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांनी संघटनात्मक क्षमतेच्या बळावर भाजपला सळो की पळो केले होते.
पायलट की गेहलोत?राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट, या दोन्ही नेत्यांना नकार देणे काँग्रेससाठी मोठी अडचण ठरू शकते. जातींच्या समीकरणात दोन्ही नेते मिळून भाजपला सामोरे जाऊ शकतात. पण या दोघांच्या नाराजीने काँग्रेसला धक्का बसू शकतो. भाजप राजस्थानमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यातच काँग्रेसमध्ये पडलेली फूट भाजपसाठी फायद्याची ठरू शकते. यामुळे राजस्थान काँग्रेस अडचणीत आली आहे.