नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट (Ashok Gehlot Vs Sachin Pilot) यांच्यातील राजकीय युद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. सचिन पायलट आज 11 एप्रिलला आपल्याच सरकारच्या म्हणजेच गेहलोत सरकारविरोधात आंदोलन करण्यावर ठाम आहेत. याबाबत राजस्थान काँग्रेस ही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे. सचिन पायलट यांच्या प्रस्तावित धरणे आंदोलनावर तीव्र आक्षेप घेत राजस्थान काँग्रेसने म्हटले आहे की, विद्यमान सरकारच्या विरोधात असे कोणतेही आंदोलन पक्षविरोधी कृती मानले जाईल.
राज्यातील मागील भाजप सरकारमधील कथित 'भ्रष्टाचार' विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी 11 एप्रिल रोजी जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर एक दिवसीय उपोषण करणार आहे, असे राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात नवी आघाडी उघडणाऱ्या सचिन पायलट यांनी रविवारी सांगितले होते. दरम्यान, आता काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सरचिटणीस सुखजिंदर रंधवा यांनी सचिन पायलटविरोधात वक्तव्य केले आहे.
सुखजिंदर रंधवा म्हणाले की, मी सचिन पायलट यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललो आहे आणि त्यांना स्वतःच्या सरकारच्या विरोधात जाहीरपणे न जाता पक्षाच्या व्यासपीठावर मुद्दे मांडण्यास सांगितले आहे. तसेच, अशा कोणत्याही कृती किंवा उपोषणाचे समर्थन नाही आणि सर्व बाबी पक्षाच्या व्यासपीठावर मांडल्या पाहिजेत. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी नाही. असे कोणतेही पाऊल पक्षविरोधी कृत्य मानले जाईल, असे सुखजिंदर रंधवा यांनी सांगितले.
याचबरोबर, "मी गेल्या 5 महिन्यांपासून AICC प्रभारी आहे आणि सचिन पायलट यांनी माझ्याशी या विषयावर कधीही चर्चा केलेली नाही. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि मी अजूनही शांततेच चर्चा करण्यासाठी आवाहन करतो, कारण ते काँग्रेस पक्षासाठी निर्विवाद संपत्ती आहेत'', असे सुखजिंदर रंधवा म्हणाले. दरम्यान, गेल्या आठवड्यात सचिन पायलट यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भ्रष्टाचाराबाबत भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्याविरोधातील कोणत्याही तक्रारीवर कारवाई केली नसल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. याविरोधात सचिन पायलट आंदोलन करणार आहेत.