नवी दिल्ली /जयपूर : राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढत चालला असून, पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांवर मंगळवार संध्याकाळपर्य$ंत कारवाई करू नये, असा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. दुसरीकडे बंडखोर आमदारांची चौकशी करण्यासाठी मानेसरला गेलेल्या राजस्थान पोलिसांना हरयाणाच्या पोलिसांनी अडवले आणि आमदारापर्यंत जाऊच दिले नाही.राजस्थानात राजकीय घटना वेगाने घडत असून, काँग्रेसने आज पायलट समर्थक दोन आमदारांना पक्षातून काढून टाकले. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याशी त्यांच्या झालेल्या कथित संभाषणानंतर काँग्रेसने ही कारवाई केली. त्यानंतर त्या ध्वनिफितीतील आवाज आपला नसून, आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे शेखावत यांनी जाहीर केले. पण या ध्वनिफितीच्या आधारे काँग्रेसने कट कारस्थानाचा तक्रार पोलिसांकडे केली. त्याआधारे शेखावत आणि दोन आमदारांच्या आवाजाचे नमुने घेण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. त्यासाठीच बंडखोर आमदार हरयाणातील मानेसरच्या ज्या हॉटेलात उतरले आहेत, तिथे पोलीस गेले. मात्र हरयाणा पोलिसांनी त्यांना अडविले. हरयाणात भाजपचे सरकार आहे. गजेंद्र शेखावत यांच्याशी आवाजाचे नमुने घ्यायलाही पोलीस जाणार असल्याचे समजते.राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये तुमचे सदस्यत्व रद्द का करू नये अशा नोटीस बजावल्या आहेत. त्यावर उत्तर द्यायला त्यांनी आमदारांना आज संध्याकाळपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर ते लगेच कारवाई करण्याची शक्यता होती. पण या नोटिसांना पायलट व समर्थकांनी न्यायालयात जे आव्हान दिले आहे, त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंगळवार संध्याकाळपर्यंत अध्यक्षांनी या आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे न्यायालयाने सांगितले आहे. पायलट गटासाठी हा दिलासा आहे.दुसरीकडे काँग्रेसनेही पायलट यांच्याबाबत आस्ते चलो धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे शुक्रवारी दिसून आले. पायलट आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यात सतत फोनवर संभाषण सुरू आहे. त्यातून तोडगा निघू शकतो का, हे पहिले जात आहे. त्यामुळे पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सध्या शांत राहावे, अशा सूचना राहुल गांधी यांनी दिल्याचे सांगण्यात आले. प्रियांका गांधी व राहुल गांधी यांच्याशी सांगण्यावरून चर्चेचा मार्ग काँग्रेसने अवलंबला आहे, असे समजते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत मात्र पायलट यांना संधी देण्याच्या विरोधात आहेत. आज अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन त्यांनी पायलट यांच्यावर शरसंधान केले. राज्यसभा निवडणुकीपासून पायलट भाजपशी जवळीक साधून होते आणि गेले वर्षभर आम्हाला दोघांत संभाषणही झाले नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे पायलट यांची समजूत काढतानाच गेहलोत दुखावणार नाहीत, याची काळजीही काँग्रेस नेत्यांना घ्यावी लागणार आहे.वसुंधरा राजे यांचे गुपितभाजपचे राजस्थानातील सर्व नेते आता पायलट यांचे समर्थन करीत असले आणि गेहलोत सरकार कधी पडेल, हे पाहत असले, तरी भाजप नेत्या आणि वसुंधरा राजे मात्र वेगळी भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. आपण गेहलोत सरकार पाडता कामा नये आणि पायलट यांना पाठिंबा देता कामा नये, असे त्यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते. तसे त्यांनी काहींना सांगितल्याचे कळते. पायलट यांना पाठिंबा दिल्यास त्यांना मुख्यमंत्री करावे लागेल आणि त्यामुळे आपले राजकारण बिघडेल, असे वसुंधरा राजे यांचे म्हणणे असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यामुळे वसुंधरा राजे यांनी सध्या शांत राहण्यामागील गुपित आहेत तरी काय, याची चर्चा जयपूर व दिल्ली जोरात सुरू आहे.
सचिन पायलट गटाला हायकोर्टाकडून तूर्त दिलासा, आमदारांवर कारवाईचा निर्णय न घेण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 6:16 AM