ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकर आणि अभिनयाच्या क्षेत्रात रेखाच्या कामगिरीला तोड नसली तरी, राजकारणाच्या पीचवर मात्र दोघांची कामगिरी अत्यंत खराब असल्याचे एका अहवालावरुन समोर आले आहे. डाटा जर्नेलिझम या संकेतस्थळाने राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आलेल्या दहा खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे.
या विश्लेषणानुसार सचिन आणि रेखाची राज्यसभेतील उपस्थिती ६ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे वास्तव समोर आले असून, त्यांनी आतापर्यंत संसदेत झालेल्या एकाही चर्चेमध्ये सहभाग घेतलेला नाही. राष्ट्रपतींना राज्यसभेवर बारा खासदारांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती ही नियुक्ती करतात. राष्ट्रपतींनी आतापर्यंत १० खासदारांची राज्यसभेमध्ये नियुक्ती केली आहे.
२०१२ मध्ये सचिन आणि रेखाची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली. २०१० मध्ये राज्यसभेवर गेलेले भालचंद्र मुणगेकर यांनी सर्वाधिक ८९ टक्के उपस्थिती लावली. उपस्थितीमध्ये सचिन तेंडुलकर आणि रेखाची कामगिरी सर्वात खराब आहे. सचिनची ५.५ टक्के तर, रेखाची ५.१ टक्के उपस्थिती आहे.
भालचंद्र मुणगेकर यांनी सर्वाधिक २७२ प्रश्न विचारले तर, रेखा, अनु आगा, बी. जयश्री आणि जावेद अख्तर यांनी आतापर्यंत सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. सचिन आणि रेखाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला त्यावेळीही त्यांच्या निवडीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता.