नवी दिल्ली- क्रिकेटचा देव व माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने नवा आदर्श घालून दिला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राज्यसभा खासदार असतानाचा त्याचा संपूर्ण पगार व इतर भत्ते पंतप्रधान निधीला दान दिले आहेत. सचिनच्या गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळातील संपूर्ण पगार व महिन्याचे भत्ते असे मिळून एकूण 90 लाख त्याने पंतप्रधान निधीला दान दिले आहेत.
कार्यकाळ संपल्यानंतर सचिनने केलेल्या या कामामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. इतकंच नाही, तर पंतप्रधान कार्यालयातूनही सचिनच्या पावलाचं कौतुक करण्यात आलं आहे. 'पंतप्रधान यामुळे कृतज्ञ आहेत. या मदतीमुळे अनेकांना फायदा होणार असल्याचं', पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.
2012 मध्ये राज्यसभा खासदार झाल्यापासून सचिन तेंडुलकरने फक्त 7.3 टक्के अधिवेशनाला हजेरी लावली. रेकॉर्डनुसार, संसदेच्या 400 अधिवेशापैकी फक्त 29 अधिवेशनात सचिन हजर होता. यादरम्यान त्याने फक्त 22 प्रश्न विचारले व एकही विधेयक सभागृहासमोर मांडलं नाही.
सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांनी राज्यसभा सदस्यत्वाच्या काळामध्ये सभागृहामध्ये फारशी हजेरी लावली नाही, कामकाजामध्येही कमी सहभाग घेतला, अशी टीका सतत केली जायची.