मुजफ्फरपुर: क्रिकेटची आवड असणाऱ्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा चाहता सुधीर कुमार यांच्याबद्दल माहिती आहे. क्वचितच कोणी क्रिकेट फॅन असेल ज्याला सुधीर यांच्याबद्दल माहित नाही. भारताच्या प्रत्येक सामन्यात आपल्याला टीव्हीवर सुधीर कुमार यांची झलक पाहायला मिळते. पण, आता याच सुधीर कुमार यांना बिहारपोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ज्या पोलिस स्टेशनचे उद्घाटन सुधीर कुमार यांच्या हस्ते झाले होते, त्याच बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील टाऊन पोलिस स्टेशनमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने सुधीर कुमारला शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. इतकच नाही तर मारहाण करुन सुधीर कुमार यांना पोलिस स्टेशनमधून पळवून लावले. या घटनेनंतर सुधीर यांनी पोलीस उपअधीक्षक रामनरेश पासवान यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
नेमके प्रकरण काय आहे ?गुरुवारी टाऊन ठाणे पोलिसांनी सुधीर कुमारचा चुलत भाऊ किशन कुमार याला ताब्यात घेतले होते. सायंकाळी सुधीर आपल्या राहत्या घरी पोहोचला तेव्हा त्याला संपूर्ण प्रकार कळला. किशन कुमारला पोलिसांनी घेऊन गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले, मात्र प्रकरण काय आहे, हे सांगितले नाही. यानंतर सुधीरने स्वत: पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी त्याच्या चुलत भावाला तुरुंगात ठेवले होते.
भावाशी बोलताना प्रकरण वाढले
आपला भाऊ लॉकअपमध्ये बंद असल्याचे पाहून सुधीर थेट त्याच्याकडे गेला आणि त्याच्याशी बोलू लागला. सुधीर आपल्या भावाशी बोलत असताना पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याला सुधीर कुमारने विरोध केला असता पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली आणि हकलून लावण्यात आले. मारहाणीनंतर सुधीर कुमारने डीएसपीकडे तक्रार केली आहे.