नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. शेतकरीआंदोलनाला आता जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरीआंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात भारताचे महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आपले मत मांडले आहे.
सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. हस्तक्षेप मात्र करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्व जण एकत्र राहू, असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले आहे. हे ट्विट करताना सचिन तेंडुलकर यांनी #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही वापरले आहेत.
पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. आता यावरून दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही यासंदर्भात आपापली मते व्यक्त केली आहेत.
कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह
कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही
कोणताही दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताला विकासाची उंची गाठण्यापासून रोखू शकत नाही. दुष्प्रचार हा भारताचे भवितव्य ठरवू शकत नाही. केवळ विकास ते ठरवू शकतो. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच विकासकडे वाटचाल करेल, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडूनही दखल
शेतकरी आंदोलनावर कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी तथ्य जाणून घेणे आवश्यक आहे. याबाबत अधिक समज असणेही आवश्यक आहे. या प्रकरणी प्रसिद्ध व्यक्तींकडून आणि अन्य व्यक्तींकडून सोशल मीडियावर हॅशटॅगचा होत असलेला वापर आणि जी काही वक्तव्य केली जात आहेत ती योग्य नाही आणि बेजबाबदारपणाची आहेत, असे अनुराग श्रीवास्तव यांनी ट्विट केलेल्या पत्रकात म्हटले आहे.