नवी दिल्ली : राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रुपयांची मदत केली आहे. सचिनने आपल्या खासदार निधीतून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 40 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील दुर्गमुल्ला गावात इंपेरियल एज्युकेशनल संस्थेची शाळा आहे. या शाळेची स्थापना 2007 मध्ये झाली. या शाळेच्या पुढील बांधकामासाठी सचिनने आपल्या स्थानिक विकास निधीतून ही मदत केली आहे. सचिनने दिलेल्या या निधीतून कुपवाडामध्ये 10 क्लास रुम, 4 प्रयोगशाळा, प्रार्थना हॉल, सहा शौचालये बांधण्यात येणार आहे. या शाळेत पहिले ते दहावीपर्यंचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, याआधी सुद्धा सचिनने शाळांच्या विविध योजनांसाठी आर्थिक मदत केली आहे. मुंबईतील शिवडी येथील एका शाळेच्या बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी निधी दिला आहे. याचबरोबर, आतापर्यंत 20 शाळा आणि शिक्षण संस्थांना अनेक उपक्रमांसाठी जवळपास 7.4 कोटी रुपयांची मदत केली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनापूर, आंध्रप्रदेशातील नेल्लोर, हिमाचल प्रदेशातील हमीरपूर, केरळमधील पातानमित्ता आणि पलक्कड, तामिळनाडू येथील त्रिपूर आणि महाराष्ट्रातील मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर येथील शाळांना विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी निधी दिला आहे.
सचिन तेंडुलकरकडून जम्मू-काश्मीरमधील शाळेला 40 लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 1:18 PM