ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मसुरीतील लॅण्डोर येथील रिसॉर्टवरुन संशोधन आणि विकास संस्थेसोबत (डीआरडीओ) सुरक्षेच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे केंद्रीय संरक्षणंत्री मनोहर पर्रिकरांची मदत मागितली आहे. ही संपत्ती सचिन तेंडूलकरचा व्यवसायिक भागीदार संजय नारंगची आहे. मनोहर पर्रिकरांनी मात्र या प्रकरणी दखल देण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
सचिन तेंडूलकर अनेकदा या रिसॉर्टवर जात असतो. सचिन तेंडूलकरसाठी हे प्रकरण इतकं गंभीर होतं की मनोहर पर्रिकरांची भेट घेण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्ध्यात संपवला होता अशी माहिती संरक्षण मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिली आहे. सचिन तेंडूलकरची भेट झाली असली तरी मनोहर पर्रिकरांनी मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची कोणतेही संकेत दिलं नसल्याचंही अधिका-यांनी सांगितलं आहे.
लॅण्डोर येथील लष्करी छावणी परिसरात ही संपत्ती आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट संवेदनशील परिसर असल्याने 50 फूट आसपास कोणतंही बांधकाम करण्याची परवानगी नाही आहे. ही इन्स्टिट्यूट डीआरडीओची आहे. ही संपत्ती उभारताना या नियमाचं उल्लंघन करण्यात आलं आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी सचिन तेंडूलकरची भेट घेऊन त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, मात्र या प्रकरणात दखल देण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळत आहे. सचिन तेंडूलकरने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार संजय नारंग यांना टेनिस कोर्ट बांधण्याची परवानगी मिळाली होती पण त्यांनी त्याऐवजी इमारत उभी केली असल्याचं सांगितलं आहे.