नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्स वेब सिरीज Sacred Games पुन्हा वादात अडकली आहे. गेल्या 6 जुलैला या वेब सिरिजला रिलीज करण्यात आले. दरम्यान, या वेब सिरिजमधील एका भागात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
AICWA ( ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन) ने Sacred Games च्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत AICWAने म्हटले आहे की, Sacred Games या वेब सिरिजच्या चौथ्या भागात राजीव गांधीच्याबद्दल अपशब्द वापरला आहे. याशिवाय वेब सिरिजच्या सबटायटलमध्ये सुद्धा आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत, असे म्हटले आहे. याचबरोबर, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, नेटफ्लिक्स, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि वेब सिरिजचे निर्मात्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसात भाजपा नेते अमित मालवीय यांनी Sacred Games या वेब सिरिजची क्लिप सोशल मीडियात शेअर केली आहे.
Sacred Games मध्ये 1980 च्या दशकातील बॅकड्राप दाखविण्यात आला आहे. नेटफ्लिक्सची Sacred Games ही वेब सिरिज विक्रम चंदा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. Sacred Games ची कहानी मुंबईतील क्राइम जगताशी संबंधीत आहे. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी या वेब सिरिजचे दिग्दर्शन केले आहे.