चंढीगड - हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा मतदारसंघ कर्नालमध्ये बसताडा टोलनाक्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. यात भाजपच्या नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ठिय्या मांडून रस्ते रोखून धरले तर विरोधी पक्षांची सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र, दुर्दैवाने पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, टोल नाक्यांवरही ठिय्या केला. त्यामुळे, पोलिसांनी शेतकऱ्यांवर निर्दयी लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर, सुशील काजल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकरी आंदोलनाचे सर्व अपडेट देणाऱ्या गुरनामसिंग चढूनी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. त्यासोबतच, सुशील काजल हे केवळ 1.5 एकर शेतजमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी होते. गेल्या 9 महिन्यांपासून ते शेतकरी आंदोलनात सहभागी होते. मात्र, करनाल टोल प्लाझावर शनिवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर, मध्यरात्री ह्रदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले, असे गुरनामसिंग यांनी सांगितले. तसेच, आपल्या ह्या बलिदानासाठी शेतकरी जमात आपली सदैव ऋणी राहिल, असेही चढूणी म्हणाले.
चौकशीची मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवावला यांनीहा या लाठीचार्जबाबत सरकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही लाठीमारीचा निंदा केली आहे. ते म्हणाले की, सरकार लाठ्या व बंदुकीच्या सहाय्याने नाही तर परस्पर सहमतीने चालवले पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड़ म्हणाले की, पोलिसांनी कोणत्या परिस्थितील लाठीचार्ज केला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे.