श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना हौतात्म्य आले. त्यामध्ये भारतीय सैन्याने कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला गमावले. गेल्या ५ वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला वीरमरण प्राप्त झाले आहे. कर्नल आशुतोष शर्मा, असे या जिगरबाज अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शोक व्यक्त केला आहे. तसेच, शहीद जवानांना श्रद्धांजलीही अर्पण केली.
जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारीही घेतली आहे. दहशतवादी आणि भारतीय सैन्याच्या या लढाईत सैन्यातील ५ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. चांजमुल्ला भागात शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर, लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला हौतात्म्य आले. यातील कर्नल आशुतोष शर्मा यांनी यापूर्वी दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र, या कारवाईत त्यांना हौतात्म्य आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शहीद जवानांचे बलिदान कधीही विसरणार नसल्याचे म्हटले. “हंदवाडा चकमकीत शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली, त्यांचा पराक्रम आणि बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांनी पूर्णपणे निष्ठेने देशाची सेवा केली. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी न थकता मेहनत घेतली” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. पंतप्रधान मोदींचे हे ट्विटर भारतीय सैन्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटनेही रिट्विट केलं आहे. भारतीय सैन्यानेही या वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजला वाहिली.
दरम्यान, उत्तर-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडाच्या चांजमुल्ला भागात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना बंधक बनवले होते. मिळेलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेरले आणि सर्व नागरिकांना सोडवले. जेव्हा बंधक नागरिकांना सोडवण्यात येत होते. तेव्हाच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. यानंतर लष्करानेही प्रत्युत्तर दिले. यात लष्कराचे अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनूज यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आले.