- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
नोटाबंदी हा देशाच्या शुद्धीकरणासाठी सुरू केलेला यज्ञ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणत असले तरी प्रत्यक्षात हा श्रीमंतांसाठीचा यज्ञ आहे व त्यात गरिबांची आहुती दिली जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. तर, नोटाबंदीचे अपयश स्पष्ट दिसत असल्याने मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केली. नोटाबंदीच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांनंतरही काँग्रेसने बोलावलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेससह आठ राजकीय पक्षांचेच प्रतिनिधी उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांच्या बोलण्याला काही अर्थ हवा. त्यांंच्या शब्दाला वजन हवे. नोटाबंदीचा निर्णय मोदी यांचा वैयक्तिक होता. त्याच्या अपयशाची जबाबदारीही त्यांनाच घ्यावी लागेल. या अपयशाला तेच जबाबदार आहेत असे मोदी यांनी सांगावे. ते जबाबदार नसतील तर जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होणार? असे राहुल गांधींनी विचारले.राहुल गांधी यांच्या तुलनेत ममता बॅनर्जी जास्तच आक्रमक होत्या. ३० डिसेंबरनंतर मोदी राजीनामा देणार का असे विचारून त्या म्हणाल्या, चांगल्या दिवसांचे आश्वासन देऊन मोदी निवडून आले आहेत. रोजगार हिरावले जात आहेत, उद्योग बंद होत आहेत, शेतकरी,शेतमजूर मरत आहेत हेच का मोदींचे चांगले दिवस. वस्तुस्थिती ही आहे की ५० दिवसांत देश २० वर्षे मागे गेला आहे.’’ ममता बॅनर्जी यांनी सरळ आरोप केला की मोदी देशाची संघ रचनाच नष्ट करीत असून ते लोकशाहीला धोकादायक आहे. १६ पक्षांना एकत्र आणणारकाँग्रेस, राजद, तृणमूल, द्रमुक, जनता दल (एस), झारखंड मुक्ती मोर्चा, इंडियन युनियन मुस्लीम लीग, एआययुडीएफ यांनी बैठकीत नोटांबदी व मोदी यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर संघर्षासाठी सगळ््या १६ विरोधी पक्षांशी चर्चा करून किमान समान कार्यक्रम तयार केला जावा म्हणजे देशभर मोदी सरकारच्या विरोधात एकच आघाडी उघडता येईल, असे ठरले. सहाराकडून मिळालेल्या दस्तावेजामध्ये शीला दीक्षित यांचे नाव आले आहे तर त्यांची चौकशी जरूर करा. दीक्षित चौकशीला तयार आहेत तर मोदी चौकशीपासून दूर का पळतात?- राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेसगब्बरसिंगप्रमाणे भीती दाखवणाऱ्या सरकारला कोण मते देईल? आज देशात अघोषित अशी महाआणीबाणी लागू आहे. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल