भिवानी - हरियाणामधील भिवानी जिल्ह्यात एक भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील एक जण भारतीय लष्करामधील जवान होता. तर अन्य एक तरुण हा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होता. हा अपघात काल रात्री रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने झाला. सध्या पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हिसारमधील गढी गावातील रहिवासी असलेला २९ वर्षीय संदीप फौजी त्याच्या मामाच्या घरी भिवानी येथील प्रेमनगर गावात आला होता. येथे तो त्याचा आतेभाऊ दीपक याच्यासोबत परिचिताला भेटून दुचाकीवरून परत येत होता. दरम्यान, प्रेमनगरच्या जवळ तिगडाना येथे पोहोचला असताना रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची दुचाकी जोराने आदळली आणि हा अपघात झाला.
मृत दीपकचा भाऊ अंकित आणि प्रेमनगरचे सरपंच नरसिंग यांनी सांगितले की, दीपक आणि संदीप मित्ताथल गावातून येत होते. रात्री सुमारे २ वाजता त्यांची दुचाकी तिगडाना गावाजवळ रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या ट्रकला आदळली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे या दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. त्यांनी सांगितले की, संदीप हा लष्करामध्ये होता. तर दीपक हा मर्चंट नेव्हीमध्ये होता. मृतांच्या नातेवाईकांनी ट्रक ड्रायव्हरविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. मृत संदीप विवाहित होता त्याला दोन मुले आहेत. तर दीपक अविवाहित होता.
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, ट्रकचालकाच्या एका छोट्याशा बेफिकीरीमुळे या दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.