जळगाव : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा गोपनीय चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होण्यापूर्वीच फुटला आहे. रविवारी सोशल मीडियावर हा १३ पानी अहवाल व्हायरल झाला आहे.पोलीस निरीक्षक सादरे यांनी १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईट नोट मध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांवर गंभीर आरोप केले होते.त्यामुळे पंचवटी पोलीस स्टेशनला जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळूमाफिया सागर चौधरी या तिघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांनी सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी पथक तयार केले होते. तीन दिवसापूर्वी चव्हाण यांनी जळगावात येऊन या प्रकरणाची चौकशी करुन काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक जयजितसिंग यांनीही या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली होती. यात त्यांनी निरीक्षक रायते यांची नाशिक येथे बोलावून चौकशी केली तर डॉ.सुपेकर यांचेही लेखी म्हणणे घेतले आहे. त्यांचा हा चौकशी अहवाल सोमवारी महासंचालकांना सादर केला जाणार होता. त्यापूर्वीच रविवारी हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मात्र त्याच्या सत्त्यतेबाबत अद्याप साशंकता आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेली अहवालाची पाने नेमक्या चव्हाण यांच्या अहवालातील आहेत की जयजीत सिंग यांच्या अहवालातील हे त्यात स्पष्ट होत नाही. कोण व कोणाला हा अहवाल सादर करणार आहे याचाही त्यात उल्लेख नाही.सादरे यांच्या गैरवर्तनाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल असे त्या अहवालास शिर्षक देण्यात आले आहे. त्यात सादरे यांची सुरुवातीपासूनची कारकिर्द, आत्महत्येपूर्वी लिहीलेली सुसाईट नोट यासह अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. दरम्यान, आत्महत्या प्रकरणाचे चौकशी अधिकारी सहायक आयुक्त विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सोशल मीडियावरील अहवाल मी पाहिला. परंतु तो माझा अहवाल नाही. चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. आहे तो अहवाल संगणकातच आहे. मी तो महासंचालकांना पाठविणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अहवाल कोणाचा आहे? हे मला सांगता येणार नाही.-जयजित सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक