नवी दिल्ली - बिहारच्या रोहतासमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. रुग्णालयात स्ट्रेचर न मिळाल्याने एका आईवर आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सासाराम सदर रुग्णालयामध्ये एका 56 वर्षीय महिलेला आपल्या 32 वर्षीय मुलाला खांद्यावर घेऊन फिरावं लागलं आहे. मुलाच्या उपचारासाठी महिला रुग्णालयात आली होती. मात्र तिथे स्ट्रेचर न मिळाल्याने ती मुलाला खांद्यावर घेऊन रुग्णालयातील वॉर्डमध्ये उपचारासाठी भटकत राहिली.
रुग्णालयातील कोणताही आरोग्य कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी पुढे आलाच नाही. नोखा पोलीस ठाणे अंतर्गत कदवा गावात राहणारी 55 वर्षीय प्रमिला देवी आपल्या 32 वर्षीय मुलगा योगेश चौधरी याच्यावर उपचार करण्यासाठी सासाराम रुग्णालयात पोहोचली होती. प्रमिला देवीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा मुलगा मजूर आहे. सायकलवरून कामावर जात असताना तो पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. यानंतर आपल्या मुलाला तशात अवस्थेत ती रिक्षातून रुग्णालयापर्यंत घेऊन आली.
स्ट्रेचर न मिळाल्याने आईवर आली मुलाला खांद्यावर नेण्याची वेळ
रुग्णालयात बरीच चौकशी केली, मात्र कोणी स्ट्रेचर दिलं नाही. यानंतर हतबल झालेल्या आईने 32 वर्षांच्या मुलाला आपल्या पाठीवर घेतलं आणि रुग्णालयात गेली. मुलाला पाठीवर घेऊन उपचारासाठी ती वॉर्डमध्ये भटकत होती. मात्र कोणीच स्ट्रेचर किंवा व्हिल चेअरचीदेखील व्यवस्था नाही केली. या महिलेचा एक फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने ही घटना घडलीच नसल्याचं म्हटलं आहे. याचा अधिक तपास करण्यात येत आहे.
रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त
रुग्णालयात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच येथील कर्मचाऱ्यांना देखील याबाबत काहीच माहिती नाही असं रुग्णालयाच्या प्रशासनाने म्हटलं आहे. सासाराम सदर रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉ. भगवान लाल यांनी दिेलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात स्ट्रेचर आणि व्हिलचेअर उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत महिलेने रुग्णाला रुग्णालयात आणलं याबाबत माहिती नाही. रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.