आपण कधी याचा विचार केला आहे की, सद्गुरू ज्या मातीला वाचविण्याचे आवाहन करत आहेत आणि लोकमत वृत्तपत्रसमूह ज्या ‘सेव्ह सॉइल’ मोहिमेला बळ देत आहे, ती माती कशी बनली? आम्हाला याची कल्पना आहे की, माती नसती तर या पृथ्वीवर बहुधा मनुष्याचे अस्तित्व राहिले नसते. दुर्दैवी बाब अशी आहे की, मातीची झीज वेगाने होत आहे. मात्र, या मातीबाबत चर्चा करण्याआधी हे जाणून घ्या की, माती बनली कशी?
आज आम्ही ज्या मातीला पाहत आहोत तिच्या निर्मितीसाठी निसर्गाला लाखो वर्षे लागली. भूकंप, ज्वालामुखी स्फोट आणि अन्य नैसर्गिक घटनांनी खडकाचे तुकडे केले. मातीच्या निर्मितीची ही पहिली प्रक्रिया होती. त्यानंतर पाऊस, वेगाने वाहणारे पाणी, हवा आणि हिमनदीने या खडकांचे बारीक तुकडे करणे सुरू केले. या बारीक तुकड्यांसोबत ओलसरपणा आणि हवेमुळे रासायनिक प्रक्रिया सुरू झाली आणि अशाप्रकारे मातीचे अस्तित्व समोर आले. यात कवक आणि शेवाळ यांनी प्रमुख भूमिका पार पाडली. ज्यामुळे मातीमध्ये जीवनशक्तीचा संचार झाला. नव्या जिवांनी जन्म घेतला आणि वनस्पती उगवणे सुरू झाले.
आपल्याला ही माहिती घेऊन आनंद होईल की, निसर्गाने मातीची निर्मिती बंद केलेली नाही. तर ही एक सातत्याने मात्र संथ होणारी प्रक्रिया आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर माती ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असंघटित पदार्थांचा वरचा थर आहे. खडक आणि वनस्पतींच्या एकत्रीकरणातून ती बनली आहे.
परिस्थिती आणि काळानुसार मातीचे अनेक प्रकार आहेत. भारताबद्दलच बोलायचे झाले तर उत्तर सपाट भागात गाळाची माती आढळते. कृषी उत्पादनात या मातीचे महत्त्वाचे योगदान आहे. ही माती हलक्या तपकिरी रंगाची असते. या भागात दरवर्षी पूर येतो आणि अनेक ठिकाणी नवी माती पसरली जाते. या मातीमध्ये ओलसरपणा शोषून घेण्याची शक्ती असते. यात पोटॅश, फॉस्फरस, चुना आणि कार्बनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात.
काळी माती ही ज्वालामुखीमुळे तयार होते. यात लोह, मॅग्नेशियम, चुना, ॲल्युमिनियम आणि कार्बनिक पदार्थ अधिक प्रमाणात असतात. पाऊस पडल्यानंतर ही माती चिकट होते आणि कोरडी झाल्यानंतर मोकळी होते. त्यामुळे ऑक्सिजन खोलपर्यंत प्रवेश करतो. ही माती गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि उत्तर कर्नाटकात अधिक प्रमाणात दिसून येते. याशिवाय लाल, पिवळी माती कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागात, तामिळनाडू, मेघालय, ओडिशा, प. बंगालमध्ये आढळून येते. यात लोह अधिक प्रमाणात असते. ही ग्रेनाइटसारख्या प्राचीन खडकांपासून तुटून बनते. ही कमी उत्पादकतेची माती समजली जाते. ज्या भागात २०० सेंमीपेक्षा अधिक पाऊस होतो, तिथे लाल माती आढळून येते. याशिवाय अनेक प्रकारची माती आढळून येते जी जीवनाचा आधार आहे.