साधुग्राम स्वच्छतेचा ठेक्याबाबत आज निर्णय? सुनावणी : स्थायीच्या सदस्यांचीही मागविली मते
By admin | Published: July 12, 2015 9:58 PM
नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद न्यायालयात जाऊन पोहोचल्यानंतर सोमवारी (दि.१३) उच्च न्यायालयात त्यावर दुपारी ३.३० वाजता सुनावणी होणार असून, मंगळवारपासून सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ होण्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिला जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयात महापालिका प्रशासन आपली बाजू मांडणार आहेच शिवाय प्रशासनाने स्थायी समितीच्या सदस्यांकडूनही मते मागवित ती न्यायालयाला सादर करण्याची तयारी चालविली आहे.
नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद न्यायालयात जाऊन पोहोचल्यानंतर सोमवारी (दि.१३) उच्च न्यायालयात त्यावर दुपारी ३.३० वाजता सुनावणी होणार असून, मंगळवारपासून सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ होण्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिला जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयात महापालिका प्रशासन आपली बाजू मांडणार आहेच शिवाय प्रशासनाने स्थायी समितीच्या सदस्यांकडूनही मते मागवित ती न्यायालयाला सादर करण्याची तयारी चालविली आहे. साधुग्राम स्वच्छतेचा ठेका वादग्रस्त ठेकेदार वॉटर ग्रेस प्रॉडक्टस् या कंपनीला देण्यास स्थायी समितीने विरोध दर्शवित द्वितीय न्यूनतम निविदाधारक क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हीसेस या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला होता. स्थायी समितीच्या या निर्णयाविरुद्ध वॉटर ग्रेस प्रॉडक्टस् कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने महापालिकेला आपली बाजू मांडण्यासाठी सोमवार, दि. १३ जुलैपर्यंत मुदत दिली होती शिवाय तोपर्यंत ठेक्याचे कार्यादेश न काढण्याचेही आदेशित केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान महापालिका प्रशासनाने आपले म्हणणे मांडण्यासाठी तयारी चालविली असून, प्रशासनाने स्थायी समितीच्या प्रत्येक सदस्यालाही पत्र पाठवत त्यांची भूमिका मांडण्याचे कळविले आहे. त्यानुसार सदस्यांना सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. या ठेक्यास सुरुवातीपासून विरोधाची भूमिका घेणारे भाजपाचे प्रा. कुणाल वाघ यांनीही आपली भूमिका नगरसचिव विभागाला कळविली आहे. महापालिका प्रशासन आता आपली नेमकी काय भूमिका मांडते यावर निर्णय अवलंबून आहे. दरम्यान, वॉटर ग्रेसचे संचालक चेतन बोरा यांनी आपण काळ्या यादीत नसल्याचे आणि आपल्यावर कोणतीही थकबाकी नसल्याचा पुनरुच्चार केला असून, न्यायालय आपला निर्णय देईल, असे स्पष्ट केले आहे.