आजपासून कार्यवाही : जगद्गुरू हंसदेवाचार्य यांची यशस्वी मध्यस्थीनाशिक : साधुग्राममधील जागांचे आखाड्यांमध्ये वाटप करण्यावरून निर्माण झालेला तिढा आज सायंकाळी अखेर सुटला. उद्या (दि. १०) सकाळी ९ वाजेपासून जागावाटपाला प्रारंभ होणार असल्याची माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास व तिन्ही आखाड्यांच्या महंतांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. हरिद्वार येथील जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी यशस्वी मध्यस्थी करीत हा तिढा सोडवला. आगामी कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणार्या साधूंच्या निवासाची व्यवस्था तपोवनातील साधुग्राममध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी आखाडे व खालशांना ठराविक जागेचे (प्लॉट) वाटप केले जात आहे. प्रशासनाने याबाबतचे सर्वाधिकार महंत ग्यानदास यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार काल सकाळी जागावाटपाला प्रारंभ झाला; मात्र प्रशासनाने महंत ग्यानदास यांच्याकडे सर्वाधिकार दिल्याने काही साधू-महंतांनी, विशेषत: दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोर शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काही जागांच्या वाटपावरूनही मतभेद निर्माण झाले होते. ही बाब महंत ग्यानदास यांच्यापर्यंत पोहोचल्यावर ते संतप्त झाले होते. त्यांची प्रकृतीही बिघडली होती. त्यामुळे नाशिक कुंभमेळा आखाडा समन्वयकपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करीत उद्या आपण अयोध्येला प्रयाण करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अनेक साधू-महंतांनी विनवणी करूनही ते आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते. आज सकाळीच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदिंसह प्रमुख अधिकार्यांनी ग्यानदास यांची तपोवन मुक्कामी भेट घेऊन मनधरणी केली. दुपारी जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी मध्यस्थी करीत ग्यानदास यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दिगंबर अनी आखाड्यात जाऊन महंत रामकिशोर शास्त्री यांच्यासह साधू-महंतांशीही बोलणी केली. सुमारे पाऊण तासाच्या चर्चेनंतर तिढा सुटल्याचे जाहीर करण्यात आले. आखाड्यात मिठाईचे वाटपही करण्यात आले. त्यानंतर मकवाना हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तिढा सुटल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी जगद्गुरू हंसदेवाचार्य, दिगंबर अनी आखाड्याचे महंत किसनदासजी, महंत रामकिशोर शास्त्री, निर्वाणी अनी आखाड्याचे महंत धरमदासजी, महंत जगन्नाथदासजी, निर्मोही अनी आखाड्याचे महंत अयोध्यादासजी, महंत राजेंद्रदासजी, प्रधान सचिव गौरीशंकरदासजी, प्रेमदासजी, वैष्णवदासजी, श्यामसुंदरदासजी आदि उपस्थित होते. जोड आहे...
साधुग्राम जागावाटपाचा तिढा सुटला
By admin | Published: July 09, 2015 9:53 PM